नराधमांना लवकरात लवकर कडक शिक्षा देण्याची मागणी
राजगुरुनगर – हैदराबाद येथील पीडित महिला डॉक्टरचा बलात्कार व खून प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पुणे नाशिक महामार्गावरील एसटीबस आगाराच्या आवारातील हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू, डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात झाली.
तालुक्यातील सामाजिक संस्थांचा मोर्चामध्ये सहभाग
या मोर्चात हुतात्मा राजगुरू सोशल फांऊंडेशनसह हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, रोटरी क्लब राजगुरुनगर, लायन्स क्लब राजगुरुनगर, छावा संघटना, हुतात्मा राजगुरू ऍकॅडमी, ढुम्या डोंगर गिरिभ्रमण, स्वामी विवेकानंद ऍकॅडमी, गगन भरारी ऍकॅडमी, चैतन्य संस्था, खेड वकील बार असोसिएशन, निर्माण पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, जाणीव-जागृती ग्रुप, हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, राजगुरुनगर नगरपरिषद आदी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
अवैध धंद्यांसह, रोडरोमिओवर कारवाईची मागणी
या मोर्चात सहभागी संस्था संघटनांनी राजगुरुनगर शहरातील निर्जन स्थळावर 100 नंबर गाडीची गस्त संध्याकाळी सात ते दहा या वेळेत नियमितपणे चालू करावी, शहरातील अवैध दारूधंदे तसेच नशापान करून गावात मोकाट फिरणाऱ्या तळीरामावर योग्य ती पोलीस कारवाई करावी. शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्यात यावे, महिला दक्षता समितीचे गठीत करावी, शाळा कॉलेजच्या गेटवर बसस्थानकावर रोडरोमिओंवर योग्य ती सक्त कारवाई पोलिसांनी वेळोवेळी करावी.
रोड रोमिओंवरती जरब बसवण्यात यावा, तसेच हैदराबाद येथील पीडित महिला डॉक्टर यांच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या व नंतर त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर कडक शिक्षा द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या.
या मागण्याचे निवेदन प्रभारी तहसीलदार रमा जोशी यांच्याकडे देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला संघटक विजया शिंदे, महिला दक्षता समितीच्या रेखाताई श्रोत्रीय, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या डॉ. नीलम गायकवाड, अंधश्रद्धा निर्मलून जिल्हा संघटक ऍड. साधना बाजारे, ऍड. मनीषा पवळे, छाया नवले, संपदा सांडभोर, यांच्यासह सुनील वाळुंज, राहुल वाळुंज, दिलीप होले, दत्ता रुके, सचिन वाळुंज, डॉ. वंदना शेवाळे, डॉ. रेणुका ठोंबरे, डॉ. माणिक बिचकर डॉ. रितिका टाकळकर, संपदा सांडभोर, नाजनीन शेख इत्यादी उपस्थित होते.