मंचर (प्रतिनिधी)- ओंगाव तालुक्याच्या आदिवासी आणि इतर भागातून घोडेगाव येथील प्रशासकीय कार्यालयांत आल्यानंतर अनेकांची कामे वेळेवर होत नाहीत, त्यामुळे गोरगरी आणि सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे घालण्याची वेळ येऊन विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर यांचा “माझी जनता, माझा परिवार’ हा उपक्रम नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे, असे मत शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.
घोडेगाव (ता. ओंगाव) येथे जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर यांच्या “माझी जनता, माझा परिवार’ उपक्रमांतर्गत शिवसेना आणि सुवर्णवेध फाउंडेशनच्या माध्यमातून पिठाची गिरणी, सोलर सिस्टिम, वॉटर फिल्टर, कडबाकुट्टी साहित्य वाटप शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले.
याप्रसंगी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, नंदुरबार धुळे येथील बबनराव थोरात, जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर, गुलाबराव पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाध्यक्ष अरुण गिरे, रवी वळसे पाटील, सुरेश भोर, शिवाजी राजगुरू, सुवर्णा दरेकर, अनिता आढारी, बबनराव गव्हाणे, महेश ढमढेरे, खंडू खंडागळे, तुकाराम काळे, मनोज काळे, विनोद निघोट, डॉ.बाळासाहे निघोट, खंडू निघोट, बाबाजी निघोट उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन घरगुती साहित्य ना नफा ना तोटा या तत्त्वावर तालुक्यातील जनतेला जिल्हा परिषदेचे गटनेते देविदास दरेकर यांनी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची बचत होणार आहे. यावेळी आढळराव पाटलांनी गटनेते देविदास दरेकर यांच्या कामाचे कौतुक केले. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, अरुण गिरे, सुरेश भोर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना राजाभाऊ काळे व आभार माजी आमदार शरद सोनावणे यांनी मानले.