वाड्यावस्त्यांवरील नागरिकांनी ओढे-नाले पार करीत बजावले कर्तव्य
वाघळवाडी – मतदान हा केवळ आपला हक्क नसून हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाहीचा वारसदार बनून एक भारतीय नागरिक म्हणून ही जबाबदारी पारपाडत बारामती तालुक्यातील निंबुत, कोळेवस्ती, खंडोबाचीवाडी, फरांदेनगर, निंबुत छपरी, वाघळवाडी, सोमेश्वर कारखाना कॉलनी परिसर, कंरजेपुल, वाणेवाडी, मुरुम, कंरजे, सोरटेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, वाकी, लोणीभापकर, मुर्टी, मोरगाव, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बु., मुढाळे, कोऱ्हाळे खु., पणदारे, माळेगाव बु. या ग्रामीण भागातील मुख्य गावामध्ये व परिसरामध्ये बारामती विधानसभेचे मतदान उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पार पडले. मतदारांनी आपल्या लाडक्या उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण केली.
ग्रामीण भागातील परिसरामध्ये मतदारांचा उत्साह, सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज होती. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत सर्व मतदान केंद्रांवरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यांच्या सहाय्यासाठी आजी माजी सैनिक संघटनेचे 20 कर्मचारी निवडणूक अधिकारी म्हणून तैनात होते. पावसाने उघडीप दिली होती. वाड्यावस्त्यांवर नागरिकांनी ओढे -नाले पार करीत चिखल तुडवत आपले कर्तव्य बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती.