पाण्यासाठी रास्ता रोको दापोडीत आंदोलन

संतप्त नागरिकांसह नगरसेविकांचाही सहभाग

दापोडी – गेल्या काही दिवसांपासून दापोडी परिसरात अत्यंत कमी दाबाने तसेच अनियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज (दि.30) दुपारी रास्ता रोको आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध केला. यावेळी स्थानिक नगरसेविकांनीही सहभाग घेत या आंदोलनास पाठिंबा दिला.

पवना धरणात मुबलक पाणीसाठा असताना ऐन सणासुदीच्या काळात दापोडीतील जयभीम नगर, गुलाबनगर, बापु काटे चाळ, नवभारत नगर आदी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असलेल्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अनियमितरित्या होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अनेक वेळा महापालिकेच्या संबंधित विभागास व अधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त नागरिक आणि महिलांनी (सोमवार) दुपारी 11 वाजता नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे व नगरसेवक रोहित अप्पा काटे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

नगरसेविका माई काटे यांनी आंदोलनकर्त्यांची समस्या जाणून घेतली. त्यानंतर युवा कार्यकर्ते शेखर काटे, रवी कांबळे, विनय शिंदे, आकिल शेख, निलेश मलिक, अमित कांबळेसह शेकडो नागरिकांनी शितळा देवी चौकात वर्दळीच्या मार्गावर ठाण मांडून रास्ता रोकोद्वारे पालिकेच्या ढिसाळ कारभाराबाबत रोष व्यक्त केला. यावेळी महिलावर्ग मोठ्या संख्येने हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेविका माई काटे व आशा शेंडगे यांनी ही या आंदोलनात सहभाग घेत त्यास पाठिंबा दिला. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन
समजूत काढली.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पाण्याच्या टाकीकडे आपला मोर्चा वळविला. विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे हे त्या ठिकाणी आले. नगरसेविका काटे व शेंडगे यांनी विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत तांबे यांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला आणि तातडीने या विभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

कार्यकारी अभियंता तांबे या प्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, शनिवारी चिंचवड भागात पाणी गळतीची समस्या निर्माण झाली होती. तेथील दुरुस्तीच्या कामामुळे काही भागात कमी दाबाने तर काही भागात अनियमित वेळेस पाणी पुरवठा झाला. उद्यापासून या भागात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी नगरसेविका काटे व शेंडगे तसेच समस्त दापोडी येथील नागरिकांना दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

अनधिकृत नळजोड धारकांवर कारवाई –

दापोडी परिसरात मोठ्या प्रमाणातील अनधिकृतपणे घेतलेल्या नळ जोडणीमुळे काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असून नवीन पाईपलाईन जोडणीच्या कामास अडचण येत असल्याचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी याप्रसंगी सांगितले. दापोडी परिसरात एकूण 2 हजार 500 अनधिकृत जोडणीधारक असून 750 रहिवाशांनी अनधिकृत नळ जोडणी घेतली आहे.

सर्व अनधिकृत नळजोडणीधारकांनी डिसेंबरपर्यंत 2 हजार 900 शुल्क भरून आपली नळ जोडणी अधिकृत करून घेण्याचे आवाहन तांबे यांनी केले. डिसेंबरनंतर नवीन वर्षात जानेवारी 2020 मध्ये अनधिकृत नळ जोडधारकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा तांबे यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.