गंभीर आजार असणाऱ्यांनी श्रमिक रेल्वेंमधून प्रवास टाळावे

रेल्वे मंत्रालयाची सूचना

नवी दिल्ली : देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या श्रमिक रेल्वेंविषयी रेल्वे मंत्रालयाने नवीन  सूचना जाहीर केली. मध्ये प्रवाशांच्या मृत्यूनंतर ही सूचना काढण्यात आली आहे. गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी श्रमिक रेल्वेमधून प्रवास करणे टाळावे, असे रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

श्रमिक रेल्वेतून प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची रेल्वे मंत्रालयाला दखल घ्यावी लागली. मात्र हे मृत्यू गंभीर आजारांमुळे झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे. आधीपासूनच आजारी असलेल्या व्यक्ती श्रमिक रेल्वेमधून प्रवास करत असल्याचे आढळले आहे. करोनामुळे त्यांच्या प्रकृतीला आणखी धोका होण्याची शक्यता आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, १० वर्षांपेक्षा कमी वयाची बालके, ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध यांनी श्रमिक रेल्वेतून प्रवास करणे अत्यंत आवश्यक असेल तरच करावा, असे रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. हीच सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारेही  दिली. रेल्वे आपल्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. जनतेकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे, असेही गोयल यांनी म्हटेल आहे.

श्रमिक रेल्वेला  ठरलेल्या स्थानकांवर पोहोचण्यासाठी कित्येक तासांचा उशीर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या टिकेला उत्तर देण्यासाठी रेल्वेमंडळाने पत्रकार परिषदही घेतली. रेल्वेने आत्तापर्यंत ३८४९ श्रमिक रेल्वे सोडल्या, त्यापैकी फक्त ४ रेल्वेंना गंतव्य स्थानकावर पोहोचण्यासाठी ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. कोणतीही रेल्वे मार्गापासून भरकटली नाही, असा दावा केंद्रीय रेल्वेमंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी केला. रेल्वेगाडीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रमिक रेल्वेगाडी सोडली जाईल, असेही यादव यांनी सांगितले.

१ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० प्रवासी रेल्वे तसेच, ३० विशेष राजधानी गाडय़ांच्या आरक्षणाचा कालावधी ३० दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना ४ महिनेआधी रेल्वे तिकीट आरक्षित करता येऊ शकेल. ही सुविधा ३१ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.