निकालाच्या दिवशी जनता मोदींना संदेश देईल – प्रियंका गांधी

राष्ट्रवादाच्या मुद्‌द्‌यावरून भाजपला केले लक्ष्य
अमेठी – मी जिथे जाते; तिथे मला जनता व्यथित असल्याचे आणि जनतेत संतापाची भावना असल्याचे जाणवते. मोदी सरकारच्या धोरणांमुळे ती स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून जनता लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी (23 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश देईल, अशी भूमिका कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरूवारी मांडली.

प्रियंका यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपची प्रचार मोहीम प्रामुख्याने राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्‌द्‌यांभोवती फिरत आहे. त्याचा संदर्भ घेत त्या म्हणाल्या, खरा राष्ट्रवाद म्हणजे जनतेविषयी प्रेम आणि आदर. मात्र, भाजपच्या कुठल्याच कृतीत ते प्रेम आणि आदर दिसत नाही. देशातील जनतेच्या समस्या सोडवणे हा खरा राष्ट्रवाद आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आताची लोकसभा निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आपण सगळेच प्रेम करत असलेल्या भारतासाठी, लोकशाहीसाठी कॉंग्रेस लढत आहे. तो लढा विचारसरणींमधील आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रियंका वाराणसीमधून मोदींविरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा प्रारंभी होती. मात्र, कॉंग्रेसने त्या मतदारसंघात वेगळा उमेदवार दिला. त्यासंदर्भात विचारल्यावर प्रियंका यांनी मी कुणालाच घाबरत नाही. पक्षाचा निर्णय मान्य करत तिथून न लढण्याचे ठरवले, असे स्पष्ट केले. यावेळी किसान सन्मान योजनेवरून त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. मागील पाच वर्षांत सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. मात्र, निवडणूक तोंडावर आल्यावर ती योजना जाहीर करण्यात आली. तो शेतकऱ्यांचा अपमान आहे, असे त्या म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.