जनता कोणाची मस्ती उतरवेल हे कळेलच

कराड – आंतरराष्ट्रीय विषयांवर बोलणारे माजी मुख्यमंत्री आता घसरून कराडच्या घाटावर पोहे खाण्यापर्यंत आले आहेत. ते पुढच्या चार दिवसांमध्ये माईकसमोर रडतीलही. ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला मदत करा, अशी भावनिक साद घालतील. मात्र, त्यांनी काहीही म्हटले तरी तुम्ही भावनिक होणार नाही, याची खात्री आहे. 24 तारखेला जनता कोणाची मस्ती उतरवेल, हे कळेलच, अशी टीका डॉ. अतुल भोसले यांनी केली.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी विंग (ता. कराड) येथे करण्यात आला. त्यावेळी सभेत ते बोलत होते. लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले, मदनराव मोहिते, डॉ. सुरेश भोसले, डॉ. दिलीप येळगावकर, भरत पाटील, जगदीश जगताप, अशोकराव थोरात, शिवाजीराव जाधव, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव, विजय यादव, आप्पा गायकवाड, सिद्धार्थ थोरवडे, रामकृष्ण वेताळ, अशोक भावके यांची उपस्थिती होती.

अतुल भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तरुणांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. माता-भगिनींना सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत जे केले ते सर्वांसाठी केले. आम्ही कधीही सत्तेसाठी, पदांसाठी काम करत नाही. उदयनराजेंना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्‍य देण्यास आम्ही बांधील आहोत. उदयनराजे म्हणाले, सत्ता विकेंद्रीकरणाचा महात्मा गांधींचा विचार कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सांगितला; पण सत्तेचे केंद्रीकरणच केले. लोकांचा आपल्या सोयीप्रमाणे राजकारणासाठी वर्षानुवर्षे वापर केला.

विकेंद्रीकरण झाले असते तर कोणताही घटक विकासापासून वंचित राहिला नसता. मला बोलता येत नाही, अशी टीका केली जात आहे. हे खरे आहे. मला त्यांच्यासारखे खोटे बोलता येत नाही. कराडला एवढी पदे मिळूनही किती विकास झाला, हा प्रश्‍न विचारला असता, विरोधकांनी फक्त पदे भोगली, असे उत्तर मिळाले. मदनराव मोहिते म्हणाले, ही लढाई तरुण विरुद्ध म्हातारे अशी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना माणसे सांभाळता येत नाहीत, त्यांनी राज्य कसे सांभाळले, हा प्रश्‍न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.