माणवासीयांनो, हा तुमचा शेवटचा दुष्काळ : उध्दव ठाकरे

शेखर गोरेंना आमदार करण्याचे आवाहन

शेखर भाऊंच्या कामाचे कौतुक
घाम गाळून जनतेसाठी स्वखर्चातून काम करणारा शेखर एकमेव आहे. त्याच्या कार्याच कौतुक कराव तेवढ कमीच आहे.अनेकजण फक्त मागत असतात पण हा मागायच सोडा ज्याला दुसऱ्याला द्यायच माहित आहे तो कधीच मागत नाही.आजही त्याने तसच बोलून दाखवलय. माझ्यासाठी काही नको फक्त माझ्या माण खटाव तालुक्‍यातील जनतेला कायमस्वरूपी पाणी, रोजगार द्या म्हणणारा हा एकमेव असल्याचे सांगताना ठाकरे यांनी शेखर गोरे यांच्या कामाचे कौतुक केले.

सातारा  – शिवसेनेच्यावतीने मी महाराष्ट्रातील जनतेला वचननामा दिला आहे.त्यातील प्रत्येक शब्दाला मी वचनबध्द असून माण विधानसभा मतदारसंघातील माझ्या आया बहिनींनी या दुष्काळामुळे काय भोगले याची मला कल्पना असल्याने हा दुष्काळ तुमच्या आयुष्यातील शेवटचा दुष्काळ असेल तसेच तुमचा सातबाराही कोरा असेल असा विश्‍वास व्यक्त करताना शेखर गोरेंना राज्यात सर्वाधीक मताने आमदार करण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

दहिवडी (ता.माण) येथे माण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शेखरभाऊ गोरे यांच्या प्रचारार्थ ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते ,ना.नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, संपर्कप्रमुख शंकरभाई विरकर, नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्यासह कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्यावतीने मी महाराष्ट्रातील जनतेला वचननामा दिला आहे. त्यातील प्रत्येक शब्दाला मी वचनबध्द असून या खटाव माण तालुक्‍यातील माझ्या माता भगिनींच्या डोक्‍यावरचा पाण्याचा हंडा एका वर्षात खाली उतरवल्याशिवाय शांत राहणार नाही. मुख्यमंत्री या मतदारसंघात म्हणाले होते , तुम्ही आपल्या उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून द्या मी तुम्हाला मंत्री देतो.

मात्र, एका बाजुला मंत्रीपदासाठी काम करणारा आमदार कुठे अन्‌ दुसरीकडे “”साहेब मला काहीही नको फक्त माझ्या जनतेला पाणी, रोजगार द्या” असे सांगणारा माझा निस्वार्थी शेखर कुठे असे सांगतानाच मंत्रीपदासाठी डीएनए बदलणाऱ्या आमदराला आता घरी घालवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न दाखवता प्रामाणीकपणे जनतेची सेवा करणाऱ्या शेखरचा मला अभिमान वाटतो. मग मला सांगा तुम्हाला शेखरसारखा आमदार पाहिजे की आजपर्यंत जसे मतदारसंघात दिवे लावले तसेच पुन्हा लाल दिवा घेऊन दिवे लावणारा आमदार पाहिजे.शिवसेना मित्राची भूमिका चांगल्या पध्दतीने निभावते.म्हणूनच आम्ही भाजपाला डीएनए बदलणाऱ्याला घेऊ नका असे सांगत होतो.मात्र त्यांनी ऐकले नाही. तीच परिस्थितीती कणकवलीतही केली आहे. आपल काम आहे मित्राच चांगल पाहण पण त्यांना ते समजेना.

तुमच वाईट होईल म्हणून आम्ही सांगत होतो जयकुमारला भाजपात घेऊ नका असा टोला ठाकरे यांनी लगावला. मराठा, धनगर, माळी समाजासह अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारी शिवसेना आहे. मराठा समाजाच्या मागे शिवसेना उभी आहे तशीच धनगर समाज व इतर समाजाच्या पाठीशी शिवसेना उभी आहे. या शिवसेनेच्या व शेखरजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून विक्रमी मताधिक्क्‌यांनी शेखर यांना विधानभवनात पाठवा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी शेखरभाऊ गोरे म्हणाले, विरोधकांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही त्यामुळे माझ्यावर बोलताना म्हणतात माझ्याकडचे पैसे संपलेत.तालुक्‍यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, नगरपंचायत, म्हसवड नगर पालिका असे प्रत्येक इलेक्‍शन लढलो आणि जनतेने माझ्यावर विश्‍वास ठेवत माझ्या नेतृत्वाखाली असणाऱ्या उमेदवारांना निवडून देत गुलाल दिला आहे.

“”साहेब मला काही नको, माझ्या माण खटावच्या लोकांना फक्त पाणी पाहिजे” पाणी नसल्याने इथल्या जनावरांना चारा नाही, शेतीला पाणी नाही, कोणताही उद्योग उभा राहत नाही म्हणून इथल्या युवकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होत नाही हे चित्र बदलण्यासाठी कायमस्वरूपी पाणी पाहिजे. माण खटाव या तालुक्‍यात 183 गावातील एकही गांव पाण्यावाचून वंचित राहिले नाही पाहिजे. सध्या निवडणुकीपुरता माण मतदार संघात “आमचं ठरलंय’ म्हणत एक सेवानिवृत्त अधिकारी टोळ्या निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यांच्याकडे जे गेलेत ते टोपीवाले गावपुढारी गेलेत. मात्र, माझ्या सोबत सामान्य जनता खंबीरपणे आहे.

विद्यमान आमदार, आणि स्वत:च्या जिल्ह्यात कोण विचारत नसलेला सांगली जिल्ह्यातील एक भाडोत्री नेता म्हणत होता युतीचे तिकीट शेखर गोरेला कधीच मिळणार नाही. “अरे कडकनाथ तुझ तू निस्तर आमच्या भानगडीत पडू नको असा इशार शेखर गोरे यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला. तसेच मी जयकुमार गोरेसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप करणाऱ्यांना सांगतो, हा शेखर गोरे एकवेळ राजकारण सोडेल पण त्या जयकुमार सोबत कुठल्याही गोष्टींमध्ये हात मिळवणी करणार नाही असा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला. जिथे निवडणुक लढवली तिथे गुलाल घेतलाय त्यामुळे साहेब आता तुम्ही कायमस्वरूपी पाणी, उद्योगधंदे, बेरोजगार हटवण्याचा शब्द दुष्काळी जनतेला द्यावा. दिलेला शब्द तुम्ही पूर्णत्वास नेता याची मला कल्पना असल्यानेच उपस्थित जनतेला आवाहन करतोय तुमचा भाऊ समजून एकच संधी द्या , हा शेखर गोरे त्याच आख्ख आयुष्य तुमच्या सेवेला वाहून घेतल्याशिवाय राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.