मोदींची वर्ध्यातील सभा ठरली सुपर फ्लॉप
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील 5 वर्षे दररोज देशातील जनतेला “एप्रिल फुल’ बनवत आले आहेत. मात्र आज वर्धा येथे झालेल्या जाहीर सभेकडे पाठ फिरवून विदर्भातील जनतेने मोदींना एप्रिल फुल केले आहे. मोदींची वर्ध्यातील आजची सभा सुपर फ्लॉप ठरली आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्धा येथे जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला निम्म्याहून अधिक मैदान रिकामे असल्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर फिरत होते. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सचिन सावंत बोलत होते. महाराष्ट्रातील मोदींच्या पहिल्या प्रचार सभेला निम्मे मैदान मोकळे असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोदींचे भाषण सुरू असताना हा व्हिडीओ घेण्यात आला असून, त्यामध्ये त्यांचा आवाजही स्पष्टपणे दिसून येतो आहे. त्यामुळे भाजप कितीही खुलासे करीत असले तरी पंतप्रधानांची पहिली जाहीर सभा फसली, हे सत्य त्यांना लपवता येणार नाही. निम्म्यापेक्षा अधिक मैदान रिकामे असताना मोदी आपल्या भाषणात मात्र मैदान खचाखच भरले आहे, अशी जुमलेबाजी करत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिवसाढवळ्या ढळढळीत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न जनता विचारत आहे. वर्धा जिल्ह्यातील जनतेने मोदींच्या सभेकडे पाठ फिरवून विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, याची चुणूक दाखवल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. त्यातही मोदीजी वर्धा येथे आलेच कशाला? त्यांनी पाच वर्षीपूर्वी वर्धा येथे केलेल्या भाषणाची टेप ऐकवली असती तरी चालले असते. मोदींचे आजचे भाषण ऐकून उपस्थितांना मोदी सत्तापक्षात आहेत की विरोधी पक्षात असा प्रश्न पडला असेल, असेही सावंत म्हणाले.
5 वर्षांत फक्त पोकळ घोषणा आणि आश्वासने
मागील 5 वर्षे पंतप्रधानांनी केवळ आश्वसने आणि पोकळ घोषणा केल्या. त्यामुळे आता जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नसून विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असताना गेल्या 5 वर्षात पंतप्रधानांना एकदाही त्यांच्या पाठीवर हात ठेवून धीर देण्यास वेळ मिळाला नाही. उलटपक्षी शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची खोटी घोषणा करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे यावेळी नरेंद्र मोदींनी कितीही आव आणला तरी त्यांना शेतकरी थारा देणार नाहीत, असा इशाराही सचिन सावंत यांनी दिला.