राज्यातील जनता सत्ताबदलच्या मूडमध्ये

शद पवार: कॉंग्रेस कमकुवत नसल्याची स्पष्टोक्ती
मुंबई : राज्यातील जनता सत्ताबदल करण्याच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे कलम 370 रद्द करण्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी केला. पक्षबदलूंना पराभूत करण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला असल्याचे स्पष्ट सूतोवाचही त्यांनी केले.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यासाठी कलम 370 हटवण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले. त्या मुद्‌द्‌याचा वापर भाजपकडून विधानसभा निवडणुकीत केला जात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, पवार पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले, एखादे राष्ट्रीय संकट आले की जनता एकवटते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारला अनुकूल जनभावना तयार झाली. त्यामुळे ते सरकार अधिक संख्याबळ गाठून पुन्हा सत्तेवर आले. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतदार वेगवेगळा विचार करतात.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तिसगढमध्ये ते दिसून आले. त्या राज्यांतील जनतेने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अनुकूलता दर्शवली. मात्र, त्याआधी काही महिनेच झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्या राज्यांतील जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केले, असेही पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
कलम 370 चा मुद्दा लावून धरणाऱ्या भाजपची पवार यांनी यावेळी खिल्ली उडवली. ते कलम हटवण्यात आल्याने आता काश्‍मीरमध्ये कुणीही जमीन खरेदी करू शकतो. त्यामुळे काश्‍मीरला जाऊन शेती करणार का, असे मी लोकांना विचारतो तेव्हा कुणीच हो म्हणत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षांना जवळ केल्याच्या घडामोडीला फार महत्व देण्याचे त्यांनी टाळले. त्या घडामोडीमुळे तरूण चेहऱ्यांना रिंगणात उतरवण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादीच्या हातात हात घेऊन निवडणुकीला सामोरा जाणारा कॉंग्रेस पक्ष रणधुमाळीतून गायब झाल्याची चर्चा अधूनमधून होते. मात्र, कॉंग्रेस कमकुवत नसल्याची स्पष्टोक्ती पवार यांनी केली. राज्यात कॉंग्रेस चांगल्या प्रकारे संघटित आहे. त्या पक्षाचे कार्यकर्ते तळागाळात नेटाने कार्य करत आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)