पुणे – मागील करोना उद्रेक काळातही जेवढी रुग्णवाढ वेगाने होत नव्हती, तेवढी गेल्या काही दिवसांपासून होत असून, रुग्ण दुप्पटीचा वेग 700 वरून आता सात दिवसांवर आला आहे; ही धक्कादायक बाब आकडेवारीतून समोर आली आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 मध्ये रुग्णवाढीचा दुपटीचा वेग हा चार दिवसांवर होता. मात्र, त्यावेळी बाधितांची संख्याही सव्वादोन हजारांपेक्षा जास्त गेलीच नाही. मात्र, सध्या तीन हजारांच्या जवळ बाधिताची संख्या जात असल्याने रुग्णवाढीचा वेग हा सात दिवसांवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. त्यावेळी रुग्णवाढीचा दुप्पट होण्याचा वेग हा अगदी तीन ते चार दिवसांवर आला होता. त्यावेळी महापालिकेने कडक लॉकडाऊन करत आणि निर्बंध घालत या वेगाला लगाम घातला होता. त्यानंतर डिसेंबर जानेवारीमध्ये रुग्णवाढ कमी झाली आणि ती अगदी 94 पर्यंत आली होती. त्यामुळे रुग्ण दुप्पटीचा वेग कमी झाला. तो अगदी 700 दिवसांवर गेला होता. मात्र, आता 14 फेब्रुवारी 2021 पासून, बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा वेग अतिशय जास्त असून, महापालिकेने आता कडक पावले उचलण्याला सुरूवात केली आहे.
आयसोलेशन सेंटर्स पुन्हा एकदा सुरू करण्याबरोबर निर्बंध घालण्याचा विचारही केला जात आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी आढावा बैठक घेऊन अनेक सूचना केल्या आहेत.