पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संस्कृती आणि एकात्मतेचे दर्शन घडविणारा, वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
प्रामुख्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविलेल्या गणेश मूर्तीवर बंदी आहे. भाविकांनी अशा मूर्ती खरेदी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी १२ मे २०२० रोजी मूर्ती बनविणारे कारागीर आणि उत्पादक यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत.
मूर्तीकारांनीही या नियमावलीचे पालन करावे. नागारिकांनी या नियमावलीचे पालन करणाऱ्या गणेश मूर्तीकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिक यांच्याकडून मूर्ती खरेदीसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी हे कराच..
– केवळ नैसर्गिक जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल जसे की, पारंपारिक शाडू माती, चिकणमाती वापरून बनवलेल्या कच्चा मालापासून मूर्ती तयार करणे.
– मूर्तींचे दागिने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांचे घटक, पेंढा इत्यादींचा वापर करावा.
– मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने रेझीन्सचा चमकदार सामग्री म्हणून वापर केला जाऊ शकतो.
– मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पाणी आधारित रंग, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक रंगाचा वापर करावा
– नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावे.
– रंगविण्यासाठी फक्त नैसर्गिकरीत्या वनस्पतींपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या रंगाचा वापर करावा.