पुणेकरांनो, नायलॉन मांजा वापरूच नका

मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजी : “पेटा इंडिया’ संस्थेचे आवाहन

पुणे – मकरसंक्रांत सणाच्या पार्श्‍वभूमीवर पतंग उडवण्याची परंपरा आहे. पण, त्यावेळी नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये, असे आवाहन “पेटा इंडिया’ संस्थेने केले आहे. नायलॉन मांजा हा पक्षी, मनुष्यासाठी हानिकारक आहे. अनेकदा तो जीवघेणा ठरतो. त्यामुळे या मांजाचा वापर पूर्णपणे टाळणे गरजेचे असल्याचेही संस्थेने सांगितले आहे.

मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवले जातात. मात्र, यासाठी नायलॉन, चिनी मांजाचा सर्रास वापर केला जातो. मात्र, पतंगबाजीनंतर हा मांजा रस्ता, विजेच्या तारा, गवत अथवा झाडांवर पडलेला असतो. यामध्ये अडकून पक्ष्यांना इजा झाल्याच्या, प्रसंगी त्याचे प्राण गेल्याच्या घटना घडतात.

याव्यतिरिक्त “चिनी मांजामुळे गळा कापला गेला’, “गाडी चालवताना मांजात अडकून अपघात झाला’ असल्याच्या अनेक बातम्याही वाचायला मिळतात. हे सर्व घातक प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये, असे आवाहन “पेटा इंडिया’ने केले आहे. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थांनीदेखील नायलॉन मांजाची विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पतंग उडवताना सावधगिरी बाळगा : महावितरण
मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी पतंग उडविताना पंतग किंवा मांजा या वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्‍यता आहे. नागरिक किंवा लहान मुलांना वीजयंत्रणेमध्ये अडकलेला माजा किंवा पंतग काढताना विद्युत अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

वीजप्रवाह सुरू असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा किंवा त्यावर चढून जाण्याचा जाणते अजाणतेपणी धोका पत्करला जातो. लोखंडी सळई किंवा काठ्यांद्वारे पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्‍यता असते. त्यामुळे काळजीपूर्वक पतंगबाजी करा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.