पुणे -रोजच्या बाधितांमध्ये सुमारे 75 जणांचा पत्ताच लागत नसल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी महापालिकेने पुन्हा एकदा पोलिसांना साकडे घातले आहे. पोलिसांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
शहरात दररोज अडिच हजारांच्या आसपास नवीन रुग्णसंख्या आढळून येत आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांना महापालिकेची यंत्रणा फोन करून ते कोठे ऍडमिट झाले त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेतात आणि त्यापैकी कोणाला लक्षणे असतील तर त्यांची चाचणी केली जाते. मात्र, दररोज सुमारे 75 रुग्णांचे पत्ते आरोग्य यंत्रणेला सापडत नाहीत किंवा त्यांच्याशी संपर्क होत नाही, अशावेळी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचाही काहीच थांगपत्ता लागत नाही, असे लोक म्हणजे समाजात फिरणारे “करोना बॉंब’ आहेत असेच म्हणायला हरकत नाही.
या सगळ्या गोष्टींमुळे महापालिका कर्मचाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा पोलीसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, रोजच्या रोज या “मिसींग’चा तपशील पोलीसांना जाणार असून, त्यांच्या पद्धतीने याचा तपास घेतील, अशी माहिती महापालिकेतील सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.