सातारा – छत्रपती शिवराय हे युगपुरुष असून, त्यांनी खर्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा पाया रचला. अशा युगपुरुषाविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. अशी माणसे लोकशाहीच्या प्रक्रियेत आली, तर भारताच्या लोकशाहीला धोका उद्भवू शकतो, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
उदयनराजे भोसले यांनी ‘जलमंदिर’ या निवासस्थानी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन, समाजमाध्यमांवरांवरील राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा समाचार घेतला. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी लोकशाहीचा पाया रचला. सर्वधर्मसमभावाची शिकवण त्यांनी दिली. त्यांना घरोघरी दैवत म्हणून पूजले जाते. भ्रमिष्ट व क्रियानिष्ट राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल समाजमाध्यमांवर मांडलेले मत अत्यंत निंदनीय आहे. ज्या व्यक्तीला युगपुरुषांची कोणतीही माहिती नाही, स्वतःची विचारधारा नाही, अशी व्यक्ती एखाद्या पक्षाचे नेतृत्व कसे काय करू शकतो? अशा व्यक्तींना महाराष्ट्र व देशाच्या जनतेने धडा शिकवावा. कारण, असा पायंडा पडत गेला तर तो देशासाठी हितकारक ठरणार नाही.
या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊन, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. या वक्तव्याचा सर्व पातळ्यांवर निषेध झाला पाहिजे. महापुरुषांबद्दल केल्या जाणार्या आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत कठोर कायदा करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले.