जम्मू-काश्‍मीरमधल्या जनतेला सुशासन हवे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

2019 हे वर्ष भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी फलदायी

मुंबई – जम्मू-काश्‍मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात आज व्यक्त केला. “बॅक टू व्हिलेज’ हा कार्यक्रम जम्मू-काश्‍मीरमध्ये यशस्वी ठरल्याचा उल्लेख करून या कार्यक्रमातला मोठ्या प्रमाणातला लोकसहभाग म्हणजेच विकासाचे बळ हे बंदुकीच्या गोळ्या आणि बॉम्बपेक्षा जास्त असते हे सिद्ध करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

या कार्यक्रमात सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सुमारे 4500 पंचायतींमध्ये जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. शोपियॉं, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग यासारख्या संवेदनशील जिल्ह्यातही अधिकारी निर्भयपणे पोहोचले. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा अमरनाथ यात्रेला सर्वात जास्त संख्येने यात्रेकरू सहभागी झाले आहेत, असे सांगून जम्मू-काश्‍मीरच्या जनतेच्या आतित्थ्यशीलतेचे त्यांनी आभार मानले.

2019 हे वर्ष भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी फलदायी ठरल्याचे पंतप्रधान म्हणाले. श्रीहरीकोटा येथून “चांद्रयान-2’ची झेप अवघ्या राष्ट्राने अनुभवली. या मोहिमेमुळे विज्ञान आणि संशोधनाकडे युवा पिढीचा कल वाढण्यासाठी स्फूर्ती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विक्रम हे लॅन्डर आणि प्रज्ञान हे रोव्हर चंद्रावर सप्टेंबरमध्ये उतरणार असून जनता आता त्याची प्रतिक्षा करत असल्याचे ते म्हणाले.

विज्ञान म्हणजे विकासाचा मार्ग आहे यावर भर देत क्विझ कॉम्पिटीशनमध्ये युवा-युवतींनी अवश्‍य सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यामध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, सरकारी खर्चाने श्रीहरीकोटा येथे भेट देण्याची संधी मिळणार आहे.

देशाच्या अनेक भागातल्या पूरस्थितीचा उल्लेख करत बाधितांना जलदगतीने मदत पुरविण्यासाठी राज्य सरकारांच्या सहयोगाने केंद्र सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले. वर्षाऋतू म्हणजे प्रफुल्लित झालेला शेतकरी, कोसळणारे धबधबे, हिरवीगार धरती असे मन उल्हसित करणारी एक बाजूही असल्याचे त्यांनी सांगितले.

“मन की बात’च्या याआधीच्या भागात आपण केलेल्या जल संवर्धनाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभल्याचे ते म्हणाले. पाच वर्षापूर्वी सुरू झालेल्या स्वच्छता अभियानाने, जन सहभागामुळे गती घेतली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. हे अभियान आता स्वच्छतेच्या पुढे जाऊन सौंदर्यीकरणाकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.