तळागाळातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ व्हावा : शिवेंद्रसिंहराजे

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस, शेगडी वाटप

सातारा  – अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गजरांसह नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी राज्य आणि केंद्र शासनामर्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना होईल, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सातारा तालुका पुरवठा विभाग आणि शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्‍यतारा इंडेन सर्व्हीस या संस्थेमार्फत शेंद्रे परिसरातील दुर्गम भागातील 40 लाभार्थ्यांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर आणि शेगड्या मंजूर झाल्या होत्या.

या लाभार्थ्यांना शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते गॅस सिलिंडर आणि शेगड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी अजिंक्‍यतारा इंडेन सर्व्हीस या संस्थेचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्यवस्थापक प्रामेद जाधव, सुहास वहाळकर, संजय पिंपळे, शकील फरास, शिवाजी यादव, संदीप खामकर, शहाजी साळुंखे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे यांनी अजिंक्‍यतारा इंडेन सर्व्हीस या संस्थेच्या कामाकाजाबाबत समाधान व्यक्‍त केले.

शासनाच्या समन्वयाने विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून या संस्थेने एक आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. अजिंक्‍यतारा कारखानास्थळावर ही संस्था कार्यरत असून सभासदांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात घरपोच आणि दर्जेदार सेवा देण्याचे
काम या संस्थेमार्फत सुरु असल्याचेही शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.