गराडे, (वार्ताहर) – आजी-माजी प्रतिनिधींनी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून अनेक आश्वासने देऊन कोणताही मोठा प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कात्रज दूध उत्पादक संघाचे माजी संचालक गंगाराम जगदाळे यांनी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवातारे यांचे नाव न घेता केली.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात गंगाराम दादा जगदाळे मित्र परिवार पुरंदर-हवेलीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करतान जगदाळे बोलत होते.
याप्रसंगी नानासाहेब जोशी, श्रीकांत राऊत, गिरीश जगताप , साकेत जगताप, आनंद भैय्या जगताप,नगरसेवक राजेंद्र भिंताडे, संदीप बेलदरे आदींसह पुरंदर हवेली तालुक्यातील गंगाराम जगदाळे मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता.
जगदाळे म्हणाले की, पुरंदर तालुक्याची दुष्काळी व विकास कामांपासून वंचित असलेला तालुका अशी ओळख पुसून पुरंदर हवेली तालुक्याचा कायापालट करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यभर झटत राहण्याची शिकवण मला घडवणार्या लोकनेते दादासाहेब जाधवराव त्यांची आहे.
त्यांनी दाखवलेला समाजसेवेचा मार्ग सदैव आचरणात आणणार आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर जगताप यांनी सूत्रसंचालन रवींद्र फुले यांनी तर समीर तरवडे यांनी आभार मानले.
प्रलंबित प्रश्न सोडविण्याची माझ्यात धमक
गुंजवणीचे पाणी पुरंदरमध्ये आणणे, जानाई शिरसाई योजना, पुरंदर उपसायोजना, राष्ट्रीय बाजार, हवेली तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याची धमक माझ्याकडे आहे.
पुरंदर हवेलीच्या जनतेने मला साथ द्यावी. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ,सर्वसामान्य जनतेच्या साथीने पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची गर्जना त्यांनी केली.