बैरूत – लेबनॉनमधील पेजर स्फोट आणि त्यांनंतर हिजबुल्लाहने प्रत्युत्तर म्हणून इस्रायली पोस्टवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आता लेबनॉनमधून सुमारे 50,000 अमेरिकन लोकांना सायप्रसला हलवण्याच्या योजनेवर काम करत आहे. इस्त्रायल लेबनॉनमध्ये जमिनीवर युद्ध सुरू करण्याच्या तयारीत असल्याची भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इस्रायल लवकरच आक्रमण करू शकते असे अमेरिकेला वाटते आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलनेही आपल्या अहवालात म्हटले आहे की इस्रायलने देशाच्या उत्तरेकडे विशेष दल आणि पॅराट्रूपर्सची लष्करी तुकडी तैनात केली आहे.
यापूर्वी हे सैनिक अनेक महिन्यांपासून गाझा पट्टीत लढत होते. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकी-टॉकीद्वारे झालेल्या स्फोटांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत. या घटनांनंतर, लेबनॉनची राजधानी बैरूतमधील रफिक हरिरी विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सर्व फ्लाइट्सवर पेजर आणि वॉकी-टॉकी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लेबनॉनची सरकारी वृत्तसंस्था एनएनएने विमान वाहतूक एजन्सीचा हवाला देत सांगितले की, प्रवाशांना पेजर किंवा वॉकी-टॉकीसारखी उपकरणे सोबत आणू नयेत अशी विनंती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अशी उपकरणे आढळून आल्यास ती तत्काळ जप्त केली जातील.