पुणे – भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने ज्या पेन्शन धारकांचे खाते स्टेट बॅंकेत आहे त्यांना जीवन प्रमाणपत्र म्हणजे लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. स्टेट बॅंकेने जारी केलेल्या माहितीनुसार या पेन्शनधारकांना हे पत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे लागणार आहे.
हे प्रमाणपत्र स्टेट बॅंकेच्या कोणत्याही शाखेत किंवा आधार आउटलेटमध्ये डिजिटली सादर करता येऊ शकेल. निवृत्तीवेतन नियमितपणे मिळण्यासाठी 30 नोव्हेंबरपूर्वी पेन्शनधारकांना प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. जर असे प्रमाणपत्र बॅंकेत दाखल झाले नाही तर, पेन्शन पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून पेन्शनची रक्कम बंद केली जाऊ शकते. मात्र, नंतर सर्टिफिकेट दिल्यावरही ही रक्कम येणे चालू राहील.
स्टेट बॅंकेच्या शाखांमध्ये या प्रमाणपत्राचा नमुना मिळतो तो भरून सादर करावा लागणार आहे. त्याचबरोबर स्टेट बॅंकेच्या शाखेत आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि खाते क्रमांक सादर केल्यास व बायोमेट्रिक माहिती दिल्यास बॅंकेचे अधिकारी आधार आधारित जीवन प्रमाणपत्र जनरेट करू शकतात. याठिकाणी प्रमाण आयडी मिळाल्यानंतर जीवन प्रमाण पोर्टलवर तो सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर उमंग ऍपच्या माध्यमातूनही हे काम केले जाऊ शकते. त्याचबरोबर आधार केंद्रावरही हे काम होऊ शकते, असे बॅंकेने म्हटले आहे.