पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर १२ येथील गृह प्रकल्पाला शौचकूप तसेच स्नानगृहाला गळती सुरु झाली आहे. सुमारे ८० शौचकूप आणि स्नानगृहाची दुरुस्ती करण्याचे आदेश देऊनही ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे पीएमआरडीएकडून संबंधित ठेकेदार कंपन्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
पीएमआरडीएने भोसरी, सेक्टर १२ येथे साडेचार हजार सदनिकांचा गृहप्रकल्प बांधला आहे. गुजरात येथील शांती आणि यशानंद या दोन बांधकाम कंपन्यांना हे काम देण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुरु असताना त्यांच्याबाबत असंख्य तक्रारी आल्या होत्या.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम करण्यासाठी शिर्के कंपनीची नेमणूक करण्यात आली. तरी, बांधकाम निकृष्ट असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मुबलक पाणी मिळत नाही,
पूर्णवेळ सुरक्षा व्यवस्था नाही, गळती तसेच सोसायटी नोंदणीचा प्रश्नही सुटत नसल्याने रहिवाशांनी पीएमआरडीए प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रत्येक क्लस्टरमधील, प्रत्येक माळ्यावर शौचकूप व स्नानृगहामध्ये वर्षभरात गळती सुरू आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शौचकूप आणि स्नानगृहाची तोडफोड करावी लागली. तीन महिन्यांत ७० ते ८० शौचकूप आणि स्नानगृह दुरुस्त करण्यात येत आहे.
वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे शांती आणि यशानंद या दोन्ही संस्थांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. अद्यापही २६ तक्रारी प्रलंबित आहेत. आता प्रत्येक गळतीमागे दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ही रक्कम लाखाच्या घरात जाणार आहे. सेक्टर १२ येथील सदनिकाधारकांनी १३ तक्रारी केल्या. त्यात पाणी समस्या, सुरक्षा व्यवस्था आणि सौर पॅनलच्या तक्रारी आहेत.
नोंदणीस विलंब
पीएमआरडीएने सेक्टर १२ येथे बांधलेल्या गृह प्रकल्पाला नुकतेच एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानुसार सोसायटीची नोंदणी होऊन हस्तांतरण होणे अपेक्षित आहे. याला विलंब लागल्यास देखभाल दुरुस्तीचे कामे पीएमआरडीएला करुन द्यावी लागणार आहे.
सोसायटी नोंदणीसाठी रहिवाशांनी अनेकवेळा मागणी केली. मात्र, पीएमआरडीएकडून यासाठी विलंब केला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.