मनपा परिसरात थुंकणाऱ्यांना दंड

महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांचे आदेश
नगर – महापालिकेच्या कार्यालयात पान, तंबाखू, गुटका, मावा खाऊन थुंकल्यास आता 200 रुपये दंड केला जाणार आहे. दंड करूनही पुन्हा पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधितांवर सार्वजनिक स्वच्छता कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी प्रशासनाला दिले आहेत. या कारवाईत नगरसेवक असो व अधिकारी, तसेच ठेकेदार, कर्मचारी किंवा नागरिक यापैंकी कोणाचीही गय करू नका, असेही आयुक्‍तांनी बजावले आहे.

महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी उपमहापौर मालन ढोणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी आयुक्‍त भालसिंग यांची भेट घेवून महापालिका कार्यालयातील अस्वच्छतेबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली. यामध्ये म्हटले आहे की, महापालिकेच्या नविन प्रशासकीय इमारतीमधील पाहिल्या मजल्यावर सध्या अतिशय अस्वच्छता पसलेली आहे. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहाच्या दरवाजच्यामध्ये एक लाकडी पार्टेशन टाकलेले असून या पार्टेशनजवळ बरेचसे पुरुष कर्मचारी दिवसभर थुंकत असतात. तसेच येणारे-जाणारे नागरीक देखील तेथे थुंकत असतात. त्यामुळे त्याठिकाणी अतिशय घाण साचलेली असून त्याठिकाणी खुप दुर्गंधी सुटलेली आहे. तसेच महिलांना स्वच्छतागृहात जाणे सुद्धा अतिशय कठीण झाले आहे.

याबाबत बऱ्याच वेळा महापालिकेचे हवालदारांकडे तक्रार केली. परंतु याबाबत काहीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे महापालिका कार्यालयातील अस्वच्छतेबाबत संबंधितांना योग ते आदेश द्यावेत, अशी विनंती या महिला कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना केली. त्याची गांभीर्याने दखल घेत आयुक्‍तांनी महापालिकेच्या कार्यालयात पान, तंबाखू, गुटका, मावा खाऊन थुंकणारास 200 रुपये दंड करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.