उरूळी स्थानकावर कारवाई : 77 हजार 990 रुपयांचा दंड वसूल
पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून उरूळी स्थानकावर तिकीट तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे 290 विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाकडून सध्या विनातिकीट प्रवाशांवर करण्यात येणाऱ्या कारवाईने जोर धरला आहे. दि. 14 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळात उरूळी स्थानकामार्गे धावणाऱ्या (गाडी क्रमांक 11042, 12158, 51402, 11301, 11406, 11078) या रेल्वे गाड्यांमध्ये कारवाई करण्यात आली. यावेळी गाड्या थांबवून तिकीट तपासणी करण्यात आली. यावेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या जवळपास 290 प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे 77 हजार 990 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वेकडून एप्रिल 2018 ते मार्च 2019 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत 3 लाख 37 हजार घटनांमध्ये 16 कोटी 29 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात विनातिकीट प्रवास करणारे 1 लाख 52 हजार प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून 8 कोटी 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पुणे विभागांतर्गत करण्यात आलेली कारवाई मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांच्यासह 25 तिकीट तपासणीस आणि 11 रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने केली. याच पद्धतीने कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
– विनातिकीट प्रवास केल्यास दंडाची तरतूद
– तिकीटाच्या रकमेसह कमीत कमी 250 रुपये दंड
– तिकीटाच्या पटीत अतिरिक्त दंड
– दंड न भरल्यास कारावासाच्या शिक्षेची शक्यता