अरूणाचलचे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू यांनी घेतली शपथ

इटानगर – भाजपचे नेते पेमा खांडू यांनी बुधवारी अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बी.डी.मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

येथे झालेल्या सोहळ्यात खांडू यांच्यासमवेत 11 कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री चौना मीन यांचाही समावेश आहे. सहा विद्यमान मंत्र्यांना खांडू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळाले. शपथविधी सोहळ्याला आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड के.संगमा, नागालॅंडचे मुख्यमंत्री नैफिऊ रिओ, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब, मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह, भाजपचे सरचिटणीस राम माधव आदींनी उपस्थिती लावली. चीनच्या सीमेलगत असणाऱ्या अरूणाचलमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकही झाली. त्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवताना भाजपने 60 पैकी 41 जागा जिंकल्या.

कॉंग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले. तर अरूणाचलात प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या जेडीयूने 7 जागा जिंकल्या. प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या खात्यात 5 जागा जमा झाल्या. तर 2 जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.