नवी दिल्ली – कर्नाटकातील सरकार पाडण्यापुर्वी त्या सरकारमधील महत्वाच्या नेत्यांवर पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवली असल्याचे द वायर या वेब पोर्टलने नमूद केले आहे. त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर आणि तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री दिध्दरामय्या यांच्या फोनचा समावेश असू शकतो, असे या वृत्तात म्हटले आहे.
फ्रान्समधील फॉरबिडन स्टोरीजने या नेत्यांचे नंबर “लिक’ केल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे. स्टोरीजने हा अहवाल नंतर ऍम्नेस्टी इंटरनॅशनलला सादर केला. त्यानंतर 16 माध्यम भागीदारांना दिला. मात्र न्यायवैद्यक तपासणीशिवाय त्यांचे फोन यशस्वीपणे भेदण्यात यश अल्याचे नेमकेपणाने सांगता येणार नाही, असे वायरच्या बातमीत म्हटले आहे.
कर्नाटकातील सरकार पाडण्याचे भटरतीय जनता पक्षाने यशस्वी प्रयत्न केले, त्या काळात त्यांचे दुरध्वनी क्रमांक या यादीत होते. कॉंग्रेस आणि जनता दला (धर्मनिरपेक्ष) सरकार 14 महिन्यांच्या कारकिर्दीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर सहा मतांनी पराभूत झाल्याने पडले.
त्यावेळी आघाडीमधील 20 सदस्य गैरहजर राहिले होते. त्यावेळी कुमारस्वामी यांच्यावर विश्वास व्यक्त करणारी 99 मते पडली. तर 105 जणांनी त्या विरोधात मते दिली. त्यानंतर कुमारस्वामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपाचे बी. एस येडीयुरप्पा यांच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता.
भारतीय जनता पक्षाने घोडा बाजार केल्याचा आरोप त्यानंतर होत होते. त्यातील 16 आमदारांनी राजीनामा दिला त्यानंतर ते भाजपाच्या उमेदवारीवर पोटनिवडणुकीत विजयी झाले.
सिध्दरामय्या यांचे स्वीय सहाय्यक व्यंकटेश “वायर’शी बोलताना म्हणाले, माझ्या फोनवर पाळत ठेवली होती का? याची मला कल्पना नाही. मी एवढेच सांगू शकतो की मी कोणतेही बेकायदा कृत्य केले नाही. हा केलेला दावा खरा असेल तर ते चुकीचे होते आणि मी त्याची कडक शब्दात निर्भत्सना करतो.
कर्नाटकातील नेतृत्वात बदल होणार आहेत आणि येडीयुरप्पा पायउतार होणार आहेत, अशा बातम्या समोर येत असतानाच हे वृत्त समोर आले आहे.