जेरूसलेम – आमच्या कंपनीतर्फे पेगॅसस हे हेरगिरीसाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे, त्याचा वापर केवळ दहशतवादी कारवाया आणि गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणातच केला गेला पाहिजे असा आमचा पहिल्यापासून आग्रह राहिला आहे असा दावा हे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या एनएसओ कंपनीने केला आहे. या कारणाव्यतिरीक्त या सॉफ्टवेअरचा वापर केला गेल्यास तो याचा दुरूपयोग झाल्याचे मानले जाते आणि असा दुरूपयोग आम्हाला मान्य नाही असेही या कंपनीने म्हटले आहे.
आम्ही हे अत्यंत पॉवरफुल हत्यार उपलब्ध करून दिले आहे. त्या आधारे अनेक दहशतवादी संघटनांवर कारवाया करण्यात आल्या असून अनेक गुन्हेगारही यातून जेरबंद झाले आहेत. आमच्यामुळेच जगभरातील लक्षावधी लोक रात्री सुरक्षित झोपू शकले आहेत आणि त्यांना रस्त्यावरून सुरक्षितपणे चालू शकले आहेत असेही या कंपनीने म्हटले आहे.
पेगॅसस प्रकरणातून जगभरात अनेक ठिकाणी जो गदारोळ निर्माण झाला आहे त्या विषयी विचारले असता कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की आम्ही फक्त हे तंत्रज्ञान विकतो. मात्र ते आम्ही ऑपरेट करीत नाही किंवा यातून मिळालेल्या माहितीवर आमचे नियंत्रण असत नाही. या तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्यास आमचा सक्त विरोध असतो आणि ज्या सरकारांशी हे सॉफ्टवेअर विकण्याचा करार केला जातो त्यातच याचा अन्य कारणासाठी गैरवापर केला जाऊ नये अशी महत्वाची अट असते असेही या कंपनीने म्हटले आहे.
आपल्या कंपनीने पेगॅसस हे सॉफ्टवेअर भारताला विकले आहे काय या प्रश्नावर कंपनीच्या अधिकाऱ्याने नेमके उत्तर दिले नाही. त्यांनी भारताला हे सॉफ्टवेअर विकल्याचे म्हटलेले नाही किंवा त्यांनी त्याचा इन्कारही केलेला नाही. आम्ही फक्त सरकारी अनुमती असलेल्या गुप्तचर यंत्रणांना किंवा कायदा अंमलबजावणी एजन्सीजनाच हे सॉफ्टवेअर विकतो. दहशतवादी आणि गंभीर गुन्हे रोखणे या एकाच कारणासाठी हे सॉफ्टवेअर वापरले जावे असे आम्ही संबंधीतांना वेळोवेळी बजावले आहे असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
आता खुद्द इस्त्रायल सरकारच करणार चौकशी
पेगॅसस सॉफ्टवेअरचा गैरवापर झाला असल्याचा जो आरोप होत आहे त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता इस्त्रायलनेच तयारी दर्शवली असून त्यासाठी इस्त्रायलने एक समितीही स्थापन केली आहे. आता यापुढे याचा गैरवापर टाळण्यासाठी लायसन्स जारी करण्याच्या प्रक्रियेचाच फेर आढावा घेतला जाणार आहे असे इस्त्रायली सरकारने म्हटले आहे. या चौकशी समितीत संरक्षण तज्ज्ञ आणि कायदे तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. यात जर काहीं गैरप्रकार आढळून आले तर यापुढे त्यातील चुका टाळण्याची दक्षता घेतली जाईल असेही इस्त्रायल सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. एनएसओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शालेव्ह हुलिओ यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.