पेगॅसस प्रकरण : मोदी, शहांची कृती म्हणजे देशद्रोहच; राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हेरगिरीसाठी पेगॅसस हे सॉफ्टवेअर भारतातील संस्था आणि प्रत्यक्ष देश विरोधातच वापरले आहे. त्यांच्या या कृतीला केवळ देशद्रोह हाच शब्द वापरला जाऊ शकतो अशी संतप्त प्रतिक्रीया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे.

या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. ते आज विजय चौकातील निदर्शनांच्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की माझे सगळे फोन टॅप केले गेले आहेत आणि हे होत आहे असे माझ्या मित्रांना काही गुप्तचर अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की पेगॅसस हे हेरगिरीसाठी वापरले जाणारे अत्यंत पॉवरफूल सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर केवळ दहशतवादी संघटनांच्या संबंधातच वापरले जावे अशी सुचना इस्त्रायलने केली आहे. पण पंतप्रधान मोदी व अमित शहा यांनी हे हेरगिरीचे सॉफ्टवेअर आपल्या देशाच्या यंत्रणेच्याच विरोधात वापरले आहे. त्याचा त्यांनी कर्नाटकातही राजकीय दुरूपयोग केला आहे.

सरकारच्या या कृतीला देशद्रोहाखेरीज अन्य कोणतीहीं उपमा देता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या साऱ्या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखेखालीच चौकशी झाली पाहिजे आणि या दुष्कृत्याबद्दल अमित शहांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.