फ्लॉवर, गवारही महाग : किरकोळ बाजारात मटार 200 ते 240 रुपये किलो
पिंपरी – भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा परिणाम दरवाढीत झाला आहे. भाजीपाल्यापैकी फ्लॉवर आणि गवारीच्या प्रतिकिलोच्या दराने शंभरी गाठली असुन, शिमल्याहून शहरात दाखल झालेल्या सफरचंदाचीदेखील शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. मटारचे दर सफरचंदाच्या दुप्पट असून, किरकोळ बाजारात मटारची 200 ते 240 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.
सध्या राज्याच्या विविध भागांत दमदार हजेरी लावलेल्या परतीच्या पावसाने खरीपातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तर भाजीपाल्यालादेखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर दुटपी-तिपटीने वधारले आहेत.
गवार आणि फ्लॉवरची किरकोळ बाजारात 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तर मटारचा प्रतिकिलोचा दर 200 ते 240 रुपयांवर पोचला आहे. करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी क जीवनसत्वाच्या फळांना मागणी वाढली आहे. त्यातच शिमल्याहून लालबुंद व चवीला गोड असलेल्या सफरचंदाची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक जागरुक नागरिक सफरचंदाच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. हेच नागरिक भाजीबाजारात भाजीपाला खरेदीला गेल्यानंतर फ्लॉवर व गवारीची सफरचंदाच्या दराने विक्री होत असल्याचा अनुभव घेत आहेत.
सध्या शिमल्याहून “शिमला’ जातीच्या गोड, चवदार व मोठ्या आकाराच्या सफारचंदाची आवक होत आहे. 20-25 किलो सफरचंदाची पेटी 1700 ते 1800 रुपयांना मिळत आहे. दिवाळीत काश्मिरहून डेलिशन जातीच्या सफरचंदाची आवक सुरु होणार आहे. या फळाच्या विक्रीदरातही फारसा फरक राहणार नाही.
– बालाजी सोमवंशी, फळविक्रेता, पिंपरी