पुणे – फुलांनी सजविलेली आकर्षक हंडी…गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष… उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी गोपाळांची मानवी मनोरा रचण्यासाठीची धडपड…हा प्रकार अतिशय उत्साहाने पाहणारा शेकडो नागरिकांचा जमाव आणि हंडी फोडल्यावर होणारा जल्लोष…दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी दिसणारे हे उत्साही वातावरण यंदा मात्र पहायला मिळाले नाही. कोणत्याही उत्सवाविना अतिशय शांततेत दहिहंडीचा दिवस पार पडला.
गोकुळाष्टमीदिवशी दहिहंडी फोडण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी शहरातील चौकाचौकात दहिहांडी फोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरवर्षी अतिशय उत्साहाने हा सोहळा आयोजित केला जातो.
पुण्यातील काही मंडळांकडून आयोजित होणारा दहिहंडी सोहळा पाहण्यासाठी तर हजारो नागरिक आवर्जून हजेरी लावतात यामध्ये हुतात्मा बाबू गेनू मंडळ, सुवर्णयुग तरूण मंडळ आदींचा समावेश आहे. अतिशय भव्य आयोजन असलेल्या या दहिहंडी सोहळ्याला नागरिकांसोबतच विविध सिने अभिनेते आणि अभिनेत्रीही उपस्थित असतात.
मात्र, यंदा करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सार्वजनिक सोहळ्यांच्या आयोजनावर बंदी घातली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करत शहरातील सर्वच सार्वजनिक मंडळांनी दहिहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी दहिहंडीचा उत्सव असूनही, पुण्यातील रस्त्यावर मात्र बराच शुकशुकाट असल्याचे दिसून आले.