कोणताही अनुचित प्रकार नाही : सर्वधर्मीयांनी केले निकालाचे स्वागत
पुणे – अयोध्या येथील राम मंदिराबाबत ऐतिहासिक निकालानंतर पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात शांतता कायम राहिली. सर्व धर्मीयांचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात या निकालाचे स्वागत करण्यात आले. कोणत्याही धर्मीयांकडून अथवा संघटनांकडून या निर्णयाविरोधात आक्षेपहार्य प्रतिक्रिया नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात शांतता स्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही अतिसंवेदनशील परिसरात कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचण्यास सुरुवात केली. अनेकांनी घरातच वृत्तवाहिन्यांवर निकालाची माहिती पाहणे पसंत केले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर वर्दळ कमी होती. नेहमीच्या तुलनेत रस्ते रिकामे वाटत होते. अवघ्या काही मिनिटांतच निकाल जाहीर झाला, त्यानंतर रस्त्यावर काही प्रमाणात वाहनांची संख्या वाढली. निकालाच्या पार्श्वभूमीवर काही शाळांमध्ये सट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, काही शाळांमधील सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मध्यावधीत म्हणजे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले.
दरम्यान, निकालानंतर अतिसंवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. सोबत राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, बॉंब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथके सज्ज ठेवण्यात आली होती. शहरात येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते होती. जिल्ह्यातील टोल नाके, सार्वजनिक ठिकाणे, महत्वाची प्रार्थना स्थळे, रेल्वे, एसटी आणि पीएमपी स्थानकांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या आवाहनाचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन केले. सोबतच पोलिसांच्या सायबर सेलच्या सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली होती.
मंचरमध्ये 70 पोलिसांची फौज
मंचर – राम जन्मभुमीच्या जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे कोठेही अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलीस दक्ष होते. मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, सरपंच दत्ता गांजाळे, आंबेगाव तालुका भाजपाचे अध्यक्ष संजय थोरात, कॉंग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष राजु इनामदार यांच्यासह मंचर ग्रामपंचायत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी, मुस्लीम बांधव उपस्थित होते.
पोलिसांची शहरात गस्त सुरू होती. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने 3 पोलीस अधिकारी, 40 पोलीस, 27 होमगार्ड, एसआयपी बटालियन वाहनाद्वारे गस्त घालण्यात आली.
ऍडमिन कॅन सेंड मॅसेज
जिल्ह्यात व्हॉट्सऍपवर कोणतेही आक्षेपार्ह मॅसेज फिरले नाहीत. अनेक ग्रुपवर ऍडमिनने केवळ ते स्वत: मॅसेज टाकू शकतील, अशी “ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मॅसेज’ ही सुविधा केली होती. तसेच पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार जरी ग्रुप सुरू असला, तरीही कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकली नाही.