राम मंदीराच्या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार नाही
पुणे – अयोध्या येथील राम मंदिराबाबत ऐतिहासिक निकालानंतर शहर आणि उपनगरात शांतता कायम राहिली. सर्व धर्मीयांचे वास्तव्य असलेल्या पुण्यात या निकालाचे स्वागत करण्यात आले. कोणत्याही धर्मीयांकडून अथवा संघटनांकडून या निर्णयाविरोधात आक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे शहरात शांतता स्थापित करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, शहरातील काही अतिसंवेदनशील परिसरात कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात निकाल वाचण्यास सुरुवात केली. अनेकांनी घरातच वृत्तवाहिन्यांवर निकालाची माहिती पाहणे पसंत केले. त्यामुळे शहराच्या मध्य भागासह उपनगरातील रस्त्यावर वर्दळ कमी होती. नेहमीच्या तुलनेत रस्ते रिकामे वाटत होते. अवघ्या काही मिनिटांतच निकाल जाहीर झाला, त्यानंतर रस्त्यावर काही प्रमाणात वाहनांची संख्या वाढली.
निकालाच्या पार्श्वभूमीवर काही शाळांमध्ये सट्टी जाहीर करण्यात आली होती. तर, काही शाळांमधील सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना मध्यावधीत म्हणजे साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आले. दरम्यान, निकालानंतर अतिसंवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.सोबत राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, बॉंब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथके सज्ज ठेवण्यात आली होती. शहरात येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्यात येते होती.
शहराच्या जवळपासचे टोल नाके, सार्वजनिक ठिकाणे, महत्त्वाची प्रार्थना स्थळे, रेल्वे, एसटी आणि पीएमपी स्थानकांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाचे पुणेकरांनी पालन केले. सोबतच पोलिसांच्या सायबर सेलच्या सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली होती.
“ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज’
शहरात व्हॉट्स ऍपवर कोणतेही आक्षेपार्ह मेसेज फिरले नाहीत. अनेक ग्रुपवर ऍडमिनने केवळ ते स्वत: मेसेज टाकू शकतील, असे “ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज’ ही सुविधा केली होती. तसेच पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार जरी ग्रुप सुरू असला, तरीही कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकली नाही.
शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यात आले होते. वेगवेगळ्या बैठकाही आयोजित केल्या होत्या. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अगोदरच उपाययोजना केल्या होत्या. सोशल मीडियावरही कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या नाहीत. सर्वांनी पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे.
– के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे