कझान : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज रशियामध्ये २०१९ नंतरची पहिली द्विपक्षीय बैठक घेतली. सीमेवर शांतता आणि स्थैर्य राखणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे. आमचा विश्वास आहे की भारत-चीन संबंध केवळ आमच्या लोकांसाठीच नाही तर शांतता, स्थिरता आणि विकासासाठीही महत्त्वाचे आहेत असे मोदी यांनी जिनपिंग यांना म्हटले आहे.
पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले की, भारत-चीन संबंध आपल्या देशांच्या लोकांसाठी आणि प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता द्विपक्षीय संबंधांना मार्गदर्शन करेल.
पंतप्रधान मोदींसोबतच्या द्विपक्षीय भेटीदरम्यान जिनपिंग म्हणाले की, कझानमध्ये तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. गेल्या पाच वर्षांत आमची ही पहिलीच औपचारिक बैठक आहे. पंतप्रधान म्हणाले की मतभेद योग्य पद्धतीने सोडवले पाहिजेत. दोन्ही देशांचे प्रतिनिधी लवकरच सीमा वादावर चर्चा करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.