श्रीनगर – पीडीपी पक्षाचे नेते मुफ्ती सज्जाद यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार आज येथे घडला. मुफ्ती सज्जाद हे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे निकटचे नातेवाईक आहेत. ते शुक्रवारच्या नमाजासाठी बिजबेहरा मशिदीत गेले असताना तेथे हा प्रकार घडला.
ही मशिद सज्जाद यांच्या घराजवळच आहे. सज्जाद हे आत गेले असताना त्यांचे व्यक्तीगत सुरक्षा अधिकारी फारूख अहमद हे मशिदी बाहेरच उभे होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोर दोघे जण होते. सुरक्षा अधिकारी अहमद खाली कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने अहमद यांची रायफल हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ती मिळाली नाही. त्यानंतर लगेच ते पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी या भागात नाकाबंदी करून हल्लेखोरांची तपासणी सुरू केली आहे.