पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिक कारवाईतून केला 21 लाखांचा दंड वसूल

महापालिकेची कारवाई : 17 हजार किलो प्लॅस्टिक, 461 किलो थर्माकोल जप्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या वर्षभरात प्लॅस्टिक वापरणाऱ्या 486 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 21 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. तर, 17 हजार 764 किलो प्लॅस्टिक, आणि 461 किलो थर्माकोल जप्त करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ‘ब’ प्रभागातून 5 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, सर्वात कमी ‘ड’ प्रभागात 95 हजार रुपये दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर सरकारने वर्षभरापुर्वी बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती.

महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या कालावधीत 486 दुकाने, आस्थापनांची तपासणी करण्यात आली. प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांकडून 21 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, सुमारे दहा हजार 17 हजार 764 किलो प्लास्टिक तर 461 किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे.

“महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकामार्फत प्लास्टिक व थर्माकोल वापरणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नागरिकांनी प्लास्टिक, थर्माकॉलचा वापर टाळावा. प्लास्टिक व थर्माकॉल आढळल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार दंड व गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– डॉ. के. अनिल रॉय, मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.