पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना सुमारे पंचवीस हजार पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका बालभारतीकडून पुस्तके खरेदी करणार असून या पुस्तकांसाठी सुमारे 15 लाख 53 हजार 624 रुपये खर्च येणार आहे.
महापालिकेतर्फे माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येते. माध्यमिक विभागाच्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीकडून पुस्तके खरेदी केल्यानंतर वाटप केली जाणार आहे.
पुस्तकांवर 15 टक्के सवलत
माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तकांची किंमत 15 लाख 53 हजार 624 रुपये आहे. या पुस्तकांच्या खरेदीसाठी निविदा व करारनामा न करता थेट पध्दतीने पुस्तके खरेदी करावी लागणार आहेत. या पध्दतीने पुस्तके खरेदी करताना बालभारतीतर्फे 15 टक्के म्हणजे 2 लाख 33 हजार 51 रुपये सवलत मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 शाळा असून त्यामधील तीन शाळा अनुदानित आहेत. त्यानुसार माध्यमिक विभागात विनाअनुदानित शाळांमध्ये सुमारे 8 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. महापालिकेच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 25 हजार 361 प्रती आवश्यक असून त्यासाठी माध्यमिक विभागाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची पुस्तकांची मागणी प्राप्त झाली आहे.