पिंपरी – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे 5 ते 24 जून या कालावधीत “वायू प्रदूषणावर मात’ या उपक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, कर्मचारी शहरात पाहणी करुन पालापाचोळा जाळणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणार आहेत.
यासंदर्भात राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार पाच हजार ते 25 हजार रुपयांपर्यत दंड आकारण्यात येणार आहे. या मोहिमेच्या कालावधीत शहरात कचरा जाळण्याची घटना पुराव्यासह पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यास संबंधित व्यक्तीला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
तसेच, पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येकाची आहे. नागरिकांनी पर्यावरण प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे. पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यालयातर्फे महापालिकेला झाडे लावा, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे वापरण्याबाबत जनजागृती करा, शून्य कचरानिर्मिती कार्यशाळांचे नियोजन करावे, याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.