पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी येत्या 14 जूनला निवडणूक होणार आहे. त्याकरिता 10 जूनला अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या वतीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालयातील महापौर कै. मधुकर पवळे सभागृहात 14 जूनला सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील.
विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची 1 वर्षाची मुदत संपली आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षीय बलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एका सदस्यांचा समावेश समितीमध्ये आहे.