पिंपरी-चिंचवड : पालिका प्रभाग समित्यांवर पुन्हा ‘महिलाराज’

भाजपकडून नावे जाहीर : आठ पैकी सहा महिला अध्यक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदासाठी (प्रभाग अध्यक्ष) भाजपकडून आज नावे जाहीर करण्यात आली. आठपैकी सहा प्रभाग समित्यांवर महिलांना संधी देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा प्रभाग समित्यांवर महिलाराज स्थापित होणार हे स्पष्ट झाले आहे.

या सर्व सदस्यांनी आपले अर्ज प्रभाग समिती कार्यालयांमध्ये दाखल केले. राष्ट्रवादीने या निवडणुकीकडे पाठ फिरविल्याने केवळ भाजप नगरसेवकांचेच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. येत्या गुरुवारी (दि.9) या सर्व प्रभाग अध्यक्षांची निवड जाहीर करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे.

महापालिकेची आठ प्रभाग कार्यालये आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी दरवर्षी नवीन अध्यक्ष निवडला जातो. नगरसेवकांमधून ही निवड होते. महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचा क्षेत्रीय किंवा प्रभाग अध्यक्ष निवडला जातो. प्रभाग अध्यक्ष निवडीचे हे तिसरे वर्ष आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार आठ प्रभागांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शनिवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत भाजपच्या आठ नगरसेवकांनी आठही प्रभागांच्या अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज सादर केला. अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.

हे असतील अध्यक्ष

अर्ज भरण्याच्या मुदतीत “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर, “ब’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी करुणा चिंचवडे, “क’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी यशोदा बोइनवाड, “ड’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी शशिकांत कदम, “इ’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी सुवर्णा बुर्डे, “फ’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी योगिता नागरगोजे, “ग’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी अर्चना बारणे आणि “ह’ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदासाठी अंबरनाथ कांबळे यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. गुरुवारी यांची निवड
जाहीर होईल.

तीन नगरसेवकांना पुन्हा संधी

प्रभाग समित्यांवर संधी देताना भाजपने महिलांना प्राधान्याने संधी दिली आहे. आठपैकी सहा महिला नगरसेवकांना अध्यक्षपदांसाठी संधी दिली आहे. याशिवाय करूणा चिंचवडे, अंबरनाथ कांबळे आणि शशिकांत कदम या तीन नगरसेवकांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेला वाटा नाही

स्थायी समिती सभापती निवडणुकीच्यावेळी भाजपचे शितल शिंदे यांनी ऐनवेळी बंडखोरी मागे घेतली होती. त्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीची शिंदे यांना साथ मिळते की काय, अशी भाजप पदाधिकाऱ्यांना शंका होती. मात्र, शिवसेना नगरसेवकांनी भाजपला साथ दिली. त्यानंतर प्रभाग समिती अध्यक्षपदी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावेळी देखील शिवसेनेला डावलण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.