२२ व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा

सलग दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकचा साठा जप्त

पिंपरी – प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 22 व्यावसायिकांवर कारवाई करुन 1 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असले तरी आरोग्य विभागाने नुकत्याच साजऱ्या झालेल्या महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपासून प्लॅस्टिक वापराविरोधात मोहीम सुरु केली आहे. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच विविध प्रकारच्या विक्रेत्यांना करण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत शहरात सर्रास प्लॅस्टिकचा वापर सुरु आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा 60 किलोचा साठा जप्त करण्यात आला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील सहायक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व कर्मचारी यांनी संयुक्तपणे कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा ते डांगे चौक, थेरगाव परिसरातील किराणा माल, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स, स्विट मार्ट तसेच चिकन-मटण शॉप आदी 200 व्यावसायिकांची तपासणी केली. यामध्ये कॅरी बॅग, प्लॅस्टिक चमचे, सिंगल युज प्लॅस्टिक ग्लास, स्ट्रा या बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आले.

अशा 22 व्यवसायिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल के. रॉय व आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.