PCMC Dust Pollution – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत वाढत चाललेल्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले असून, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष रुपेश बाजीराव पटेकर यांनी आयुक्त, शहर अभियंता आणि पर्यावरण विभागाला निवेदन देत सात दिवसांत ठोस उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.शहराला स्मार्ट सिटी म्हणवले जात असले तरी प्रत्यक्षात हे शहर धुळीच्या विळख्यात अडकत चालले आहे, अशी टीका मनसेने केली आहे. शहरातील वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीपलीकडे गेले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक श्वसनविकार, फुफ्फुसांचे आजार आणि ऍलर्जीच्या समस्यांना सामोरे जात आहेत.शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसवण्यात आलेली एअर प्युरिफायर यंत्रणा (WAYU) बंद अवस्थेत असून त्यांची देखभालच केली जात नसल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे. वेळेवर फिल्टर न बदलणे, वीजपुरवठा खंडित असणे यामुळे कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील अनेक बांधकाम साइट्सवर ग्रीन नेट लावलेले नाहीत, पाण्याची फवारणी केली जात नाही, तसेच धूळ नियंत्रण नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बिल्डर मोकाट सुटले असून कोणावरही दंडात्मक कारवाई होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या ७ दिवसांत धूळ नियंत्रणासाठी ठोस कारवाई झाली नाही आणि दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर मनसे महानगरपालिका कार्यालयात मनसे स्टाइलने जाब विचारला जाईल. यापुढे केवळ नोटीस नको, तर प्रत्यक्ष जमिनीवर कारवाई हवी, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली असून, यानंतर उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी संपूर्णपणे पालिका प्रशासनाची असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.