पिंपरी – महापालिकेतर्फे कुदळवाडी येथील उद्यानातील मोकळ्या जागेत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अद्ययावत व्यायामशाळा आणि सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्च येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी, कुदळवाडी येथील सेक्टर सोळामध्ये सावतामाळी उद्यान आहे. या उद्यानामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत महिला आणि पुरुषांसाठी अद्ययावत स्वतंत्र व्यायामशाळा इमारत उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज असे सभागृह देखील साकारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या. मूळ 3 कोटी 27 लाख 22 हजार 644 रुपयांची ही निविदा होती. मेसर्स सिद्धनाथ कार्पोरेशन, मेसर्स बी. के. खोसे आणि मेसर्स धनेश्वर कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांच्या निविदा
प्राप्त झाल्या.
प्राप्त झालेल्या निविदांमध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 2.20 टक्के कमी दराची निविदा मेसर्स सिद्धनाथ कार्पोरेशन या ठेकेदार कंपनीने सादर केली. त्यांनी हे काम 3 कोटी 20 लाख 2 हजार 746 रुपये अधिक 9 लाख 96 हजार 291 रुपये रॉयल्टी आणि 2 लाख 36 हजार 340 रुपये मटेरिअल टेसिंटग चार्जेससह एकूण 3 कोटी 25 लाख 35 हजार 377 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कुदळवाडी येथील उद्यानातील मोकळ्या जागेत महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र अद्ययावत व्यायामशाळा आणि सुसज्ज सभागृह उभारण्याचे काम मेसर्स सिद्धनाथ कार्पोरेशन या ठेकेदार कंपनीला देण्यात येणार आहे.