पुणे – अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या “पीसीएम’ग्रुपच्या एमएचटी-सीईटीचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले. ही सीईटी 12 ते 20 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. त्यासाठी “पीसीएम’ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अर्थात “पीसीएम’ ग्रुपच्या विद्यार्थ्यांची सीईटी कधी होणार आहे, त्याचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याच्या प्रतीक्षेत होते. आता राज्य सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वीच “पीसीबी’ ग्रुपच्या विद्यार्थ्यांची सीईटी 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली. आता “पीसीएम’ ग्रुपची सीईटी 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 13, 14, 15, 16, 19 आणि 20 ऑक्टोबर या कालावधीत सीईटी होणार आहे.
या विद्यार्थ्यांना दि. 4 ऑक्टोबरपासून प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.