मुंबई – पेटीएम कंपन्यांच्या माजी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर देण्यात आलेले होते. आता या कंपनीची लवकरच शेअर बाजारावर नोंदणी होणार आहे. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना शेअर देण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडे किमान एक कोटी रुपये असतील असे सांगण्यात आले.
कंपनीचा 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आयपीओ शेअर बाजारावर नोंदला जाणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये या आयपीओची बऱ्यापैकी खरेदी भारतातील गुंतवणूकदारांनी केली आहे. या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील ही सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.
पेटीएमचे माजी कर्मचारी असलेले सिद्धार्थ पांडे यांनी पत्रकारांना सांगितले की, नऊ वर्षापूर्वी मी जेव्हा या कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा एकूण कंपनीचे स्वरूप पाहता माझ्या वडिलांनी या कंपनीत काम करण्यास विरोध केला होता. मात्र मला या कंपनीत नाविन्यपूर्ण काम करण्यास मिळत असल्यामुळे मी काम करीत राहीलो.
नऊ वर्षानंतर मी दुसऱ्या कंपनीत रुजू झालो आहे. मात्र या कंपनीत असताना माझ्याकडे या कंपनीचे भरपूर शेअर आले होते. वडिलांनी त्या काळात जरी मला विरोध केला असला तरी आता माझ्याकडील शेअरचे मूल्य जवळजवळ 75 लाख रुपये होणार आहे. त्यामुळे माझे वडील आनंदी आहेत. मी त्यावेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत