पाटण – प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या चोपडी-बेलवडे रस्त्याच्या कामात बांधकाम विभागाने केलेली बोगसगिरी नुकतीच उजेडात आली आहे. काम न करताच या रस्त्याच्या कामाचा निधी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिरवल्याचे उघड झाले आहे.
चोपडी-बेलवडे रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाने दीड वर्षापूर्वी 77 लाख 10 हजार 46 रुपयांची निविदा काढली होती. 76 लाख 41 हजार 496 रुपयांची अंतिम निविदा मंजूर करण्यात आली होती. ही निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम न करताच निधी लाटल्याची चर्चा होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाटण उपविभागाकडून या कामाची माहिती मागवली असता, ही धक्कादायक बाब उघड झाली.
या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने केलेले काम आणि त्यावर झालेला खर्च यामध्ये प्रचंड तफावत आहे. पूर्ण काम झाले नसतानाही बांधकाम विभागाने ठेकेदाराला 57 लाख 18 हजार 133 रुपये अदा केल्याचे स्पष्ट झाले आहे. चचेगाव (ता. कराड) येथील आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका 2017-18 मध्ये मिळाला होता.
कामावर देखरेख करण्याची जबाबदारी दक्षिण पाटण सार्वजनिक बांधकाम उपविभागाची होती. काम पूर्ण करण्याचा कालावधी चार महिन्यांचा होता; परंतु रस्त्याचे जुजबी काम करून ठेकेदाराने जून 2018 मध्ये बिलाद्वारे 43 लाख 34 हजार 377 आणि त्यानंतर 13 लाख 83 हजार 756 रुपये काढले होते. मात्र, काढलेली रक्कम आणि झालेले काम यामध्ये तफावत आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून ठेकेदाराने निधी लाटल्याचा आरोप होत आहे. त्यातून बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीचे “अर्थपूर्ण’ व्यवहार उजेडात आले आहेत. याबाबत बांधकाम विभागाकडे माहिती मागवल्यानंतर ठेकेदाराने घाईगडबडीत आठ दिवसांत उर्वरित काम हाती घेतले.
त्यानंतर आठ दिवसांत पुन्हा या रस्त्याची खडी उघडी पडली. बांधकाम विभागाचा अंदाजपत्रकाप्रमाणे बीबीएम व कार्पेटचा समावेश या कामांमध्ये होता. मात्र, ठेकेदाराने बीबीएम करून या कामाची बिले काढली आहेत. सीलकोटचे काम अद्याप अपूर्ण आहे. या रस्त्यासाठी 76 लाख 41 हजार 496 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत झालेल्या कामावर बांधकाम विभागाने ठेकेदाराला 57 लाख 18 हजार 133 रुपये अदा करण्यात आले आहेत.
चोपडी-बेलवडे रस्त्याचे काही अंतराचे काम ठेकेदाराने गेल्या वर्षी केले तर 400 मीटरचे काम दहा ते पंधरा दिवसांपूर्वी केले. त्यामुळे या कामावरून बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी चौकशी करावी.
दिलीप जाधव ग्रामपंचायत सदस्य, चोपडी