संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
भीमशक्ती संघटनेचा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
शेतकरी, मजूर, दुर्बल घटकातील नागरिकांची उपासमार
राजगुरूनगर शाखेतून 66 लाख 75 हजारांची गुंतवणूक
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – रॉयल ट्विंकल स्टार क्लब, सिट्रस चेक इन्स अंडर मिराह ब्रॅंड प्रा. लि. ट्विंकल एनव्हॉयरोटेक यांनी खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. गुंतवणूकदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत, खोटी आमिषे दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे झाले नाही तर भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे.
पुणे जिल्ह्यात रॉयल ट्विंकल स्टार क्लब, सिट्रस चेक इन्स अंडर मिराह ब्रॅंड प्रा. लि.. ट्विंकल एनव्हॉयरोटेक यांनी खोटे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. यात खेड तालुक्यातील सर्वाधिक गुंतवणूकदार आहेत. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे शेतकरी, मजूर, दुर्बल घटकातील नागरिक, महिला, छोटे व्यावसायिक ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ठेवी गोळा करताना स्थानिक एजंटची नेमणूक करून त्यांच्याद्वारे ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना गंडा घातला जात होता.
कंपनीचे संचालक ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या संचालक मंडळ व त्यांचे 40 कोअर कमिटीच्या सदस्य, चीफ मार्केटिंग ऍडव्हायजर, पायोनियर शेअर्स होल्डर व 61 शाखांचे शाखाधिकारी यांनी राज्यातील ठेवीदारांचे खोटे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. त्यांच्यावर महाराष्ट ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 या कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. कंपनीचे देवेंद्र जैन यांनी खोटी दिवाळखोरी जाहीर करून मूळ कागदपत्रे ठेवीदारांकडून घेतली आहेत.
गुंतवणूकदारांकडून तपासणी केल्यानंतर राजगुरूनगर शाखेतून 66 लाख 75 हजार 955 रुपयांच्या रकमा गेलेल्या आहेत; मात्र याबाबत एफआयआरच्या प्रति उपलब्ध नसून खेड पोलीस ठाण्यातही नोंद नाही. तालुक्यातील एजंटच्या कमिशनपोटी 870 कोटीचा सहा वर्षांचा टीडीएस हा शासनाकडे जमा केलेला नाही. 21 मार्च 2017 रोजी कंपन्यांनी ऍक्सिस बॅंकेतून संचालक व कोअर कमिटीच्या मेंबरच्या खात्यात करोडो रुपये जमा केले असल्याची माहिती संघटनेच्या समोर आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी स्थानिक एजंटवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यास कंपनी टाळाटाळ करीत आहे. शिवाय तालुका पातळीवरील कार्यालये बंद केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील लाखो गुंतणूकदारांचे पैसे परत मिळावेत, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अन्यथा भीमशक्ती संघटनेच्यावतीने पुणे जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनर, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड पोलीस स्टेशन यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
गुंतवणूकदारांचा एजंटवर रोष
राज्यातील मुंबई, नगर, नाशिक, लासलगाव, जालना, सोलापूर येथे या कंपनीच्या विरोधात ठेवीदारांनी फिर्याद दिल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; मात्र पुणे जिल्ह्यात अद्यापर्यंत गुन्हा दाखल जाला नाही. दरम्यान रॉयल ट्विंकल स्टार क्लब, सिट्रस चेक इन्स अंडर मिराह ब्रॅंड प्रा. लि. ट्विंकल एनव्हॉयरोटेक या कंपन्यांच्या एजंटची नावापुढे लाखो रुपयांचे आकडे असलेली यादी प्रसिद्धी झाल्याने एजंटकडे पैसे मागणीसाठी गुंतवणूकदार हेलपाटे मारत आहेत. कंपनीने पैसे घेऊन पोबारा केला आहे; मात्र एजंटला गुंतवणूकदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.