केडगाव- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पारगाव – केडगाव जिल्हा परिषद गटातील इछुकांनी सोशल मीडियावर प्रचाराचा जोर धरुन, ओबीसी आरक्षणाकडे लक्ष ठेवून मोर्चेबांधणी केली होती. परंतु ओबीसी आरक्षणाबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी आता 4 मेपर्यंत पुढे गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तारीख पे तारीखमुळे इंच्छुकांच्या आशेवर पाणी फिरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे केडगाव गटात भर ऊन्हात शांततामय वातावरण पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची मुदत संपली असली तरी अजुनपर्यंत त्याबाबत वेळापत्रक जाहीर झाले नाही मध्यंतरी निवडणुकीची चाहुल लागल्यानंतर इछुकांनी तयारी सुरु केली होती. परंतु पुन्हा एकदा वातावरण थंड झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक असो वा तालुक्यातील कोणतीही निवडणुकीत आतापर्यंत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी प्रत्येक निवडणुकीत ताकद अजमावत एकमेकांना काट्याची टक्कर दिली आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ नयेत, अशी भूमिका सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती. त्यावर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार शासनाने आपल्याकडे विशेष कायदा करून घेतले आहेत. या कायद्याला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात 12 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
या याचिकांची पुढील सुनावणी आता 4 मेपर्यंत पुढे गेली आहे. परिणामी, हा निकाल शासनाच्या विरोधात गेला तरी आयोगास तयारीसाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागेल. परिणामी, ऑक्टोबरनंतरच निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इच्छुकांसह गावनेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बंडोबा शांत करण्यासाठी पर्यायी पदांचा वापर
दौंड तालुक्यात आगामी निवडणुकांसाठी भाजपचे आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे, त्यामुळे आमदार कुल व थोरात यांचा उमेदवार निवडीसाठी व इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे आजी – माजी नेत्यांचा कस लागणार आहे. दरम्यान, सध्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांकडून बंडखोरी होवू नये म्हणून त्यांचा बंडोबा आधीच शांत करण्यासाठी निवडणुकीच्या अगोदरच काहींना काही पर्याय देता येतोय का? याची चाचपणी सुरू असून त्या पद्धतीने इच्छुकांना पदे देण्याचे काम दोन्ही गटांकडून सुरू आहे.
गण, गट रचनेकडे करडी नजर
पारगाव – केडगाव जिल्हा परिषद गटात जवळपास 18 गावे, वाड्यावस्त्यांचा समावेश होता. यामध्ये पारगाव पंचायत समिती गणात पारगाव, पिंपळगाव, नाथाचीवाडी, लडकतवाडी, देलवडी, एकेरीवाडी, नानगावगणेश रोड, अममाळ. ही गावे येतात. तर केडगाव गणात केडगाव, धुमाळीचा मळा, निंबाळकरवस्ती, केडगाव स्टेशन, देशमुख मळा, हंडाळवाडी, वाखारी, खोपोडी, दापोडी ही गावे येतात. परंतु नवीन गण, गट रचना तसेच आरक्षणाबाबत काय बदल होणार याकडे इच्छुकांसह गावनेत्यांचे लक्ष लागले आहे.