नवी दिल्ली – सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरु असलेले कॉंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कार्ती चिदंबरम यांची विदेशवारीची परवानगी मागणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कार्ती चिदंबरम यांनी पूर्वीप्रमाणेच यावेळी देखील विदेशवारीच्या परवानगीसाठी अनामत म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे 10 कोटी रुपये जमा करण्याचा प्रस्ताव न्यायालयासमोर ठेवला मात्र न्यायालयातर्फे यावेळी त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्या. अनिरुद्ध बोस यांचा सहभाग असलेल्या पिठाने कार्ती यांची याचिका फेटाळून लावताना कार्ती यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असल्याने आणि सीबीआय आणि ईडीकडून त्यांची सध्या चौकशी सुरु असल्याने न्यायालयाने त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कार्ती चिदंबरम हे तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून निवडून आले असून त्यामुळे कार्ती यांनी विदेशात जाण्यापेक्षा आपल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करावे, असे देखील न्यायालयाने म्हंटले आहे.