मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या…

तुम्हाला माहीत आहे? लहान मुलांमध्ये, विशेषत: मुलींमध्ये, मूत्रमार्गाला प्रादुर्भाव होण्याचे (यूटीआय) प्रमाण खूप जास्त आहे. मातांनो, तुमच्या मुलाला यूटीआय होऊ नये यासाठी या काही उपयुक्‍त टिप्स आहेत. मूत्रमार्गाला प्रादुर्भाव होणे (यूटीआय) लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते हे कळल्यावर तुम्हाला धक्‍का बसेल. हो, तुम्ही ऐकले आहे ते बरोबर आहे! मूत्रमार्गात शिरण्याच्या प्रयत्नातील जीवाणू लघवीवाटे बाहेर टाकले जातात.

मात्र, हे जीवाणू मूत्रमार्गातून बाहेर टाकले जात नाहीत, तेव्हा ते मूत्रमार्गात वाढतात आणि त्यातून प्रादुर्भाव होऊ शकतो. तुमच्या मुलाच्या त्वचेवरील जीवाणू मूत्रमार्गात शिरला, तर तुमच्या मुलाला यूटीआय होऊ शकतो. यात मुले शूला जाऊन आल्यानंतर स्वच्छता कशी राखतात यामुळे खूप फरक पडू शकतो. खूप वेळ लघवी अडवून ठेवणे हेही यूटीआयमागील कारण असू शकते.

शिवाय, लहान मुलांमधील यूटीआयच्या प्रमुख कारणांमधील एक म्हणजे मुलांच्या आतड्यात निर्माण होणारा ई. कोली. तुम्ही यूटीआयची शक्‍यता खालील उपायांनी कमी करू शकता

मूत्राशय पूर्ण रिकामे होईल याची काळजी घ्या
जेव्हा मूल लघवी अडवून ठेवून मूत्राशय पूर्ण रिकामे होऊ देत नाही, तेव्हा मूत्राशयाचे स्नायू मूल शू करत असताना घट्ट होतात आणि म्हणूनच मूत्राशय पूर्ण रिकामे न होताच लघवी थांबू शकते. तेव्हा तुमचे मूल दोन धारांत शू करत आहे का, यावर लक्ष ठेवणे व त्याचे मूत्राशय पूर्ण रिकामे होईल याची काळजी घेणे हे आईने केलेच पाहिजे.

नीट पुसणे अत्यावश्‍यक
लघवीची जागा नीट पुसून घेणे हे तर अत्यावश्‍यकच आहे. पार्श्‍वभाग स्वच्छ ठेवण्याची सवय लावा आणि तो पुसण्यासाठी तुमचे मूल वापरलेला टिश्‍यू पेपर पुन्हा वापरणार नाही याची काळजी घ्या. पार्श्‍वभाग व लघवीची (मूत्रमार्ग) जागा नीट पुसणे आवश्‍यक आहे. यासाठी वैद्यकीय मान्यता असलेली चांगली उत्पादने वापरा.

योग्य कपडे वापरा
तुमची मुले सुती कपडे वापरतील, विशेषत: अंडरपॅण्ट्‌स सुती असतील याची काळजी बघा. सुती कपड्यांमुळे त्या जागी हवा खेळती राहते. त्वचेला चिकटणाऱ्या जीन्स आणि घट्ट कपडे अजिबात नको. असे कपडे घातल्यास त्या जागी हवा खेळती राहणार नाही आणि अशी जागा जीवाणूंच्या प्रादुर्भावासाठी मोकळे रान ठरते. आणखी एक मुद्दा म्हणजे मुलांचे बाथरूम गाठेपर्यंत लघवीवर नियंत्रण राहत नसेल, तर त्यांचे आतील कपडे वारंवार बदलत राहा. ही जागा ओलसर राहिली तर जीवाणूंची वाढ होते आणि यूटीआयचा धोका वाढतो.

भरपूर पाणी प्या
तुमच्या मुलाला वेळोवेळी पाणी पिण्यास सांगा. मुलांनी वारंवार पाणी पिऊन मूत्राशय रिकामे करत राहिले पाहिजे, कारण, मूत्राशय जेव्हा सर्व दूषित द्रव्ये बाहेर टाकते, तेव्हा त्याचे आरोग्य सर्वांत चांगले राहते. तुम्हाला माहीत आहे? गडद रंगाची लघवी होत असेल तर तेथे जळजळ होते. मग मुलाला सारखी ती जागा धरून ठेवावीशी वाटते आणि हे चांगले नाही.

बबल बाथ्सना द्या निरोप
बबल बाथ्स अजिबात वापरू नका. हो, त्यामुळे यूटीआय होऊ शकते! बबल बाथमध्ये फेसाळ साबण असतो. त्यामुळे लहान मुलांच्या त्वचेवर खाज सुटते व जननेंद्रीयांनाही खाज सुटते. मुलांना साधी आंघोळ घाला.

मुलांना बद्धकोष्ठ होणार नाही याकडे लक्ष द्या
लघवी अडवून ठेवतात तशीच काही मुलांना शौचही अडवून ठेवण्याची सवय असते. जेव्हा मल मोठ्या आतड्याच्या खालील भागात साचून राहते, तेव्हा मूत्रमार्गाशी जीवाणू जमतात. त्यामुळे मलविसर्जनाची क्रिया नियमित होणे खूप महत्त्वाचे आहे.

– डॉ. जगदीश काथवटे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)