न्यूयॉर्क : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कंपनी असलेल्या गूगल इंडियाची NCLAT च्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. एनसीएलटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी लॉ अपील लवादाने गूगलला ठोठावलेल्या 1338 कोटी रुपये दंडाच्या 10 टक्के रक्कम सात दिवसात भरण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
जगातील सर्वात शक्तीशाली सर्च इंजिन असलेल्या गूगलला भारतीय स्पर्धात्मक आयोगाने 1338 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंड आदेशाविरोधात गूगलने आधी एनसीएलएटीमध्ये अपील केले होते. मात्र गूगलला एनसीएलएटीमध्येही अंतरीम दिलासा मिळाला नाही, त्यांनी सीसीआयच्या दंडाची रक्कम कायम ठेवली. त्यामुळे गूगलने सर्वोच्च न्यायालयात एनसीएलएटीच्या आदेशाला आव्हान दिले, पण आज झालेल्या सुनावणीत तिथेही गूगलच्या पदरी निराशाच आली. आता त्यांना आठ दिवसात 1338 कोटी रुपये दंडाच्या 10 टक्के रक्कम सात दिवसात भरायची आहे.
भारतीय स्पर्धात्मक आयोगाने गूगलला अँड्राईड (android OS) या मोबाईल ओएसच्या स्पर्धाविरोधी धोरणासाठी हा दंड ठोठावला होता. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या आदेशात गूगलने सीसीआयच्या आदेशाविरोधात केलेल्या अपीलावर 31 मार्चपूर्वी निर्णय देण्याचेही निर्देश एनसीएलएटीला दिले आहेत.
सीसीआयच्या आदेशाविरोधात गूगलला कोणताही तात्पुरता दिलासा न देण्याची एनसीएलएटीची भूमिका योग्यच असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत स्पष्ट केले.