हरित लवादाच्या दणक्यानंतर महापालिकेला जाग : अतिक्रमण हटविण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा
पिंपरी – शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणावर राडारोडा व भराव टाकण्यात आला आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्याचा कृती आराखडा हरित लवादाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात सर्व अतिक्रमणे व राडारोडा काढण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, त्याचे क्षेत्र व कामकाज नेमून देण्यात आले आहे. या कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी भराव टाकून भंगार दुकाने व इतर व्यवसाय थाटण्यात आले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात यावीत व त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे हरित लवादाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. नदीपात्रातील निळ्या आणि लाल पूररेषेमध्ये झालेली बांधकामे, निरनिराळ्या प्रकारची अतिक्रमणे, नदीपात्रात राजरोस टाकण्यात येत असलेला राडारोडा, मैलामिश्रित सांडपाणी यामुळे नदीच्या वहनक्षमतेवर अडथळा ठरत आहेत. याशिवाय नदी मृत अवस्थेत जाऊन श्वास कोंडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमलेल्या अधिकाऱ्यांना कारवाईचा अहवाल हरित लवादाला द्यावा लागणार आहे. तसेच तिन्ही नद्या काठ सीमारेषांचा पाटबंधारे अधिकाऱ्यासमवेत संयुक्त सर्व्हे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
अनधिकृत बांधकामे, राडारोडा व भराव टाकणाऱ्यांची यादी तयार करणे. त्या सर्वांना एमआरटीपी ऍक्टनुसार कायदेशीर नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतरही बांधकामे किंवा भराव काढून न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नद्यांमध्ये होत असलेल्या या अतिक्रमणबाबत पर्यावरण प्रेमींनी आणि स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने आवाज उठविला आहे. काहींनी थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. हरित लवादाच्या आदेशानंतर महापालिकेने कालबध्द कृति आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये पवना, मुळा व इंद्रायणी नदी काठावरील राडारोडा भराव व इतर अतिक्रमणे काढण्यास अधिकारी नेमण्यात आले आहेत.
अधिकारी व त्यांना नेमून दिलेले कामकाज
सतीश इंगळे- पवना, मुळा नदी (पिंपळे सैदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, पिंपळे गुरव, रावेत, किवळे, मामुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी), राजेंद्र राणे – मुळा, इंद्रायणी नदी (मोशी, बोऱ्हाडेवाडी, चिखली, चऱ्होली, तळवडे, बोपखेल), शिरीष पोरेड्डी- पवना नदी (रहाटणी, पिंपरीगाव, थेरगाव)